बुद्धिवाद

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कोणतीही बुद्धिवादी चळवळ सुरू केली नाही. तथापि बुद्धिवाद हा त्यांच्या जीवनातील सर्व आचार-विचारांचा गाभा होता. त्यांच्या विचारांत भाबडेपणा कोठेही आढळणार नाही. शब्दप्रामाण्यापेक्षा प्रत्यक्ष प्रमाणावर आधारलेल्या विज्ञानाचा पुरस्कार त्यांनी केला. विज्ञाननिष्ठेचा सावरकरांनी केवळ पुरस्कार केला नाही तर ती आचरली. जीवनाच्या विविध क्षेत्रांत सावरकरांची कर्तव्यबुद्धि प्रकर्षाने दिसते. लोकहीत ही सर्व आचारांची कसोटी असे ते मानीत. हिंदूंप्रमाणे ख्रिस्ती, मुस्लिमादिकांमधील अनेक भाकड समजुतींवर त्यांनी प्रहार केले. तर्ककर्कश बुद्धि त्यांच्या भाषण व लेखनातून ठायीठायी दिसते. सावरकरांचे बुद्धिवादी विचार तत्कालीन समाजाला धक्कादायक वाटले यात नवल ते काय? सावरकरांचे विचार समाजाला आज आणि उद्यादेखील मार्गदर्शक आहेत यात त्यांचे विभूतिमत्व सामावलेले आहे. मृदुकोमल कविमन आणि कठोर बुद्धिवाद यांचा विलोभनीय संगम सावरकरांच्या उभ्या आयुष्यात झालेला दिसतो.